छत्रपती संभाजीनगर Police Dance On DJ : हर्सूल कारागृहाबाहेर (Harsul Central Jail) डीजेच्या तालावर पोलिसांनी रात्री अकरा वाजता बेधुंद नृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर गुन्हेगार शिक्षा भोगत असलेल्या हर्सूल कारागृहाबाहेरच पोलिसांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात डीजेच्या कर्णकर्कश आवाजात बेधुंद नाच केला. कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेत नियम धाब्यावर बसवून पोलिसांचा भर रस्त्यावर बेधुंद नाचगाण्याचा व्हिडीओ रात्री ११.३० नंतर व्हायरल झाला.
डीजेवर पोलिसांनी धरला ठेका: व्हिडिओमध्ये गणवेशात असलेले पोलीस आणि काही व्यक्ती गाण्याच्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंदपणे नाचत आहेत. काही पोलीस हवेत स्नो स्प्रे करताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांनी याचा व्हिडिओ केल्यावर हा प्रकार समोर आला. काही स्थानिक सहभागी झाल्याचं देखील भान या पोलिसांना उरलं नव्हतं. एकीकडं लोकसभेच्या आचारसंहितेमुळं सामान्यांसाठी बहुतांश गोष्टींवर निर्बंध आहेत. रस्त्यावरील प्रत्येक उत्सवासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असताना, हर्सूल कारागृहाबाहेरच सुरू असलेल्या धिंगाण्यामुळं गंभीर प्रश्न उपस्थित झाला.