पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध पक्ष संघटना तसंच शिवप्रेमीकडून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आमच्याकडं फिर्याद प्राप्त झाल्या आहेत. आम्ही कायदेशीर बाबींची पाहणी करून लवकरच याबाबत निर्णय घेणार आहे."
फिर्यादींना मुद्देमाल परत : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं आज (दि.६) येरवडा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन इथं परिमंडळ 04 कार्यक्षेत्रामधील दाखल गुन्ह्यातील 4 कोटी 86 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "आज आम्ही १०१ फिर्यादींना अंदाजे ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला आहे. पुणे शहरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील जवळपास १५ कोटींचे मुद्देमाल ५०० फिर्यादींना परत केलं आहे. तसंच नव्यानं ही मोहीम सुरू ठेवत जुने तसेच नवीन फिर्यादी यांना त्यांचे मुद्देमाल परत केलं जाणार आहेत. तसेच वाहन मुक्त पोलीस स्टेशन देखील लवकरच आम्ही करणार आहोत."