अकोला ZP Teacher Molested School Girls : कोलकातानंतर मुंबईतील बदलापूर इथल्या दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेनं देशभर संताप पसरला आहे. या अत्याचाराची चर्चा थांबत नाही, तोच अकोल्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच घाणेरडा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे. प्रमोद सरदार असं त्या नराधम शिक्षकाचं नाव आहे.
शिक्षक दाखवत होता मुलींना अश्लील व्हिडिओ :मंगळवारी संध्याकाळी याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक वर्ग 8 वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. हा शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याचप्रमाणं त्यांच्याशी अश्लील गप्पा ही मारायचा. अखेर आज पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले. पालकांनी उरळ पोलिसांकडं धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तर सहा मुलींचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलं आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शिक्षकाच्या कृत्यानं पालकांमध्ये संताप :जिल्हा परिषद शिक्षकाच्या या कृत्यानं पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी लगेच या प्रकरणामध्ये शिक्षक प्रमोद सदार याला अटक केल्यानंतर पालकांनी शांततेची भूमिका घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. नाहीतर पालकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.