महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूर शहर आजही बंद; पोलिसांनी 38 आरोपींना केलं अटक: तगडा बंदोबस्त तैनात, सुषमा अंधारे देणार भेट - Badlapur Protest - BADLAPUR PROTEST

Badlapur Protest : बदलापूर शहरातील चिमुकल्यांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली. आज बदलापूर शहरात नागरिकांनी बंदची हाक दिली आहे. दुसरीकडं उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज बदलापूर इथं भेट देणार आहेत.

Badlapur Protest
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:29 AM IST

ठाणे Badlapur Protest : बदलापूरमध्ये गेल्या आठवड्यात शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूरकरांनी मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून, याबाबत एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी तब्बल 10 तास संतप्त नागरिकांनी आंदोलन करत रेल रोको केला. आंदोलनाचे पडसाद आज देखील उमटू शकतात. त्यामुळं पोलिसांनी खबरदारी घेतली असून, आज देखील बदलापूर शहरात बंद पाळण्यात येत आहे. बदलापुरात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बदलापुरात भेट देणार आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी 40 आंदोलकांना अटक केली आहे, तर 2 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर शहरात आजही इंटरनेट सेवा बंद :मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रु धुरांच्या नळकांड्या आणि सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी संतप्त आंदोलकांना रेल्वे स्थानकातून पांगवले. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र यानंतर बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा आज देखील बंद असल्याची माहिती समोर येत आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी 163 कलम लागू करण्यात आली आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : मंगळवारी झालेल्या संतप्त आंदोलनामध्ये नराधाम आरोपीला आमच्या स्वाधीन करा..., आम्ही त्याला फाशी देतो..., आरोपीला फाशी द्या... अशी घोषणाबाजी संतप्त आंदोलकांनी केली. यावेळी पोलीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांना यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. यानंतर सायंकाळी रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी नाईलाजानं शेवटचा उपाय म्हणून पोलिसांना आंदोलकावर सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे आंदोलकांनी संतप्त होऊन आक्रमक भूमिका घेतली. बदलापूरमध्ये काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांची आंदोलकांनी तोडफोड केली. संतप्त आंदोलक आजही आंदोलन करू शकतात, तसेच वाहनांची तोडफोड करू शकतात. याची खबरदारी म्हणून बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागवली असून, दंगल नियंत्रण पथक, रेल्वे पोलीस आणि बदलापूर पोलीस यांची सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे.

आज सुषमा अंधारे देणार भेट :बदलापूरमध्ये चिमुकलींवर अत्याचार केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावानं तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यामुळे बदलापुरातील आंदोलन चिघळलं. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. आज बदलापूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र आज उबाठा गटात्या नेत्या सुषमा अंधारे या भेट देणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक ! शिक्षक विद्यार्थिनींना दाखवायचा अश्लील व्हिडिओ: करायचा मुलींचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ZP Teacher Molested School Girls
  2. बदलापूर अत्याचार प्रकरण : कल्याणहून बदलापूरच्या दिशेनं लोकल सेवा सुरू, आज तगडा पोलीस बंदोबस्त तैनात - Badlapur Protest

ABOUT THE AUTHOR

...view details