महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, 'असा' असेल संपूर्ण दौरा - PM Modi Maharashtra Visit

विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असताना महिनाभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी राज्यात येत आहेत. आज ते मुंबई, ठाणे, वाशीम येथील विविध विकासकामांचं उद्घाटन करतील.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

PM Narendra Modi on maharashtra visit today 5 oct 2024, inaugurating various development projects in Washim and Thane
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा (ETV Bharat)

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (5 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर असून वाशिम आणि ठाण्यात विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि 32,800 कोटींच्या नागरी प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. पंतप्रधानांच्या या संपूर्ण नियोजित दौऱ्याविषयी जाणून घेऊयात.

'असा' असेल संपूर्ण दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. तसंच वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता ते बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाण्यात 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रोतून प्रवास देखील करणार आहेत.

पंतप्रधानांचे वाशिम मधील कार्यक्रम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज वाशिममध्ये सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा 'पीएम किसान सन्मान निधी'चा 18 वा हप्ता वितरित करतील. या 18 व्या हप्त्यासह 'पीएम किसान योजने' अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे 3.45 लाख कोटी रुपये आहे. पंतप्रधान राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याचंही वितरण करतील.

त्यानंतर पंतप्रधान मोदी 'कृषी पायाभूत सुविधा निधी' (AIF) अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे.

त्याशिवाय, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करतील. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्याकरता परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे 200 रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात येतोय. तसंच 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0' अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्क पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पित केले जातील. कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील.

पंतप्रधानांचे ठाण्यातील कार्यक्रम : ठाण्यात पंतप्रधान मोदी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन-3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचं उद्घाटन ते करणार आहेत. या विभागात 10 स्थानकं असून त्यापैकी 9 स्थानकं भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन-3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे. ज्यामुळं मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल.

सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किमी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानकं आहेत. तसंच 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

याशिवाय, पंतप्रधान सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाच्या फेज-1 ची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे. त्यानंतर 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा -

  1. भाजपाचा विदर्भावर 'फोकस'; लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं पीएम मोदी, शाहांचे दौरे वाढले - Assembly Elections 2024
  2. पावसाचा फटका! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द - PM Modi Pune Visit Cancelled
  3. "तुकडे-तुकडे गँग आणि अर्बन नक्सल काँग्रेस चालवते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - PM Narendra Modi Wardha Visit

ABOUT THE AUTHOR

...view details