पुणे Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी भूमिपूजन करण्यात आलं. तसंच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या मार्गावर धावणाऱ्या पहिल्याच मेट्रोचं स्टेअरिंग महिला पायलटनं हाती घेतलं आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला सुरवात झाली. 'महिला दिना'च्या दोन दिवसांआधीच पुणे मेट्रोनं हा योग जुळवून आणला.
मेट्रो चालवताना खूप आनंद : वनाझ ते रामवाडी या मार्गावरील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला आजपासून सुरुवात झाली. या मार्गाचं स्टेअरिंग प्रतीक्षा माठे या महिला पायलटनं हाती घेतलं आणि तिनं मेट्रो चालवली. याबाबत बोलताना प्रतीक्षा माठे म्हणाली की, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं आणि उद्घाटनाच्या दिवशीच मेट्रो चालवताना खूपच आनंद होत आहे. आपल्या हस्ते पहिली राइड होतेय याचा खूप अभिमान वाटतोय. मेट्रोचे पायलट म्हणून कार्यरत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मलाच मेट्रो चालवण्याचं भाग्य मिळालं असल्याचा आनंद शब्दांत सांगण्यापलीकडचा आहे."