नंदुरबार Pm Modi Rally In Maharashtra Today: नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली. सुमारे दीड एकरच्या मैदानात भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून लाखोच्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सभेसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांनी दिली आहे. गुरुवारी श्रीरामपूर इथं बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. या टीकेला आज पंतप्रधान मोदी कसा पलटवार करतात, याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण :महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेत आहेत. डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये येत असून भाजपाच्या वतीनं जय्यत अशी तयारी करण्यात येत आहे. सुमारे दीड एकरच्या मैदानात भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून एक ते दीड लाख लोक या सभेला येतील, असा विश्वास भाजपाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. या सोबतच सभास्थळी सुरक्षेच्या दृष्टीनं देखील उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबतच अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उमेदवार डॉ. हिना गावित यांनी दिली.