अमरावतीPlastic Road :ग्रामीण भागात अवजड वाहतूक कमी असल्यामुळं अशा ठिकाणी प्लास्टिकचे रस्ते सहज बांधता येतात. असाच रस्ता अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयानं करून दाखला आहे. महाविद्यालयातील विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या नाविन्यपूर्ण उद्योजक मंडळानं प्लास्टिकवर संशोधन करत 2016 मध्ये रस्ता तयार केला आहे. त्यामुळं भारत सरकारनं या प्रयोगासाठी महाविद्यालयाला 26 फेब्रुवारीला पेटंट प्रमाणपत्र दिलं आहे.
असा आहे प्रयोग :प्लास्टिक पिशव्या वापरून रस्ते बनवण्याचा पहिला प्रयोग 2005 मध्ये आफ्रिकेत करण्यात आला होता. आफ्रिकेतील या संशोधनावर आधारित, IIT खरगपूरनं 2010 ते 2012 या काळात प्लास्टिकचा वापर करून प्लास्टिकचा रस्ता बनवण्याचा प्रयोग केला. आफ्रिकेतील रस्ता तसंच आयआयटीमधील काँक्रीटचा रस्ता त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाविद्यालयानं रस्ता तयार केला आहे. यात प्लास्टिकचे शेल तंतोतंत जोडण्यात आले आहेत. त्यामुळं रस्त्यावर भेग पडल्यास संपूर्ण रस्ता खराब होणार नाही. मात्र, रस्त्याचा जेवढा भाग खराब झाला तेवढाच दुरूस्त करण्यात येणार आहे. त्यामुळं उर्वरित रस्ता सुरक्षित, मजबूत राहणार आहे, असं प्राध्यापक डॉ. श्रीकांत हरले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. प्राध्यापक डॉ. श्रीकांत हरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा चार बाय वीस मीटर लांबीचा रस्ता 2016 मध्ये महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आला होता.
20 टक्क्यांनी वाचतो खर्च :टाकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांची एक पट्टी तयार केल्यानंतर त्यातून सेल निर्माण करण्यात येतात. त्यानंतर या सेलचा वापर काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी केला जातो. या प्लॅस्टिक सेलमुळं रस्ता तयार करण्यासाठी लोखंडाची गरज भासत नाही, असं डॉ. श्रीकांत हरले सांगितलं. प्लॅस्टिकचे सेल एकामेकांना जोडून सिमेंटमध्ये चांगल्या प्रकारे फसतात. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत प्लास्टिक वापरून बनवलेला रस्ता 20 टक्के खर्चात बचत करणारा आहे. तसं हा रस्ता वीस वर्षेदेखील खराब होत नाही, असंही प्रा. हरले यांनी स्पष्ट केलं.