शिर्डी-साईबाबांच्या पवित्र स्थळी भाविकांची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवलाय. या उपक्रमांतर्गत गेल्या दहा महिन्यांत भाविकांच्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्यांना परत करणाऱ्या प्रामाणिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलंय. या कालावधीत संस्थानच्या 106 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जवळपास 15 लाख रुपयांच्या वस्तू ज्यात सोने-चांदीच्या दागिन्यांपासून ते मोबाईल फोनपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. त्या सापडलेल्या वस्तू भाविकांना परत केल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर भाविकांचा विश्वास वाढलाय : साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास माळींनी राबवलेली ही योजना एक सकारात्मक बदलाचे उत्तम उदाहरण आहे. एक अधिकारी कसा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करून संस्थेची प्रतिमा उंचावू शकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेवर भाविकांचा विश्वास वाढलाय. पनवेल येथील भाविक अंजना विजय भोपी यांची पर्स हरवली होती. त्यात 15.190 रुपये होते. मला वाटले की, आता ते परत मिळणार नाही. मात्र, मी संरक्षण कार्यालयात पोहोचेपर्यंत कर्मचाऱ्यांनी ते शोधून मला परत केलंय. माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे.
कर्मचाऱ्यांमधील चांगुलपणाला वाखाणण्याजोगा :साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी खरोखर चांगले आहेत. कर्मचाऱ्यांमधील चांगुलपणाला वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या साईबाबांवरील श्रद्धेला तोड नसल्याचं सांगत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केलंय. यामुळे कर्मचारी सापडलेल्या मौल्यवान वस्तूही कोणताही लोभ न ठेवता प्रामाणिकपणे परत करीत आहेत. त्यांचा आम्ही यथाचित सन्मान करतो, त्यांना लहानशी भेटवस्तूही देतो. यापुढे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या अनुमतीने आणि स्वाक्षरीने सन्मानपत्रही देण्याचा विचार आहे, असेही यावेळी सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा भाविकांना सुखद अनुभव :साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखालील या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेमुळे भाविकांना सुखद अनुभव येत आहे. अनेकदा भाविक आपल्या मौल्यवान वस्तू हरवून खूप निराश होतात. मात्र, साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना आपल्या वस्तू अनपेक्षितपणे परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात आणि साईबाबांविषयीची श्रद्धा दृढ होते.
साईबाबा मंदिर परिसरासह भक्त निवासात वस्तू सापडल्या : गेल्या दहा महिन्यांत 9,69,580 रुपयांचे सोने सापडले, त्यातील 6,77,929 रुपयांचे सोने भाविकांना परत करण्यात आले. 1,25,905 रुपयांच्या चांदीच्या वस्तू सापडल्यात. त्यातील 7.780 रुपयांच्या वस्तू परत करण्यात आल्यात. 70.650 रुपयांची 38 घड्याळे आणि 8 मोबाईल सापडलेत. त्यातील 46.650 रुपयांच्या वस्तू परत करण्यात आल्यात. 3.11.556 रुपये रोख सापडले, त्यातील 1.28.563 परत करण्यात आलेत. ज्या वस्तू कोणाच्या आहेत हे न कळाल्याने त्या संस्थानाकडे जमा करण्यात आल्याचं सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी सांगितलंय.
हेही वाचाः