छत्रपती संभाजीनगर No More Free Education In CSMC :सध्या सीबीएससी शिक्षण घेण्यासाठी पालकांची धडपड पाहायला मिळते. नवीन शिक्षण प्रणाली गोरगरिबांच्या मुलांना मिळावं, यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं सीबीएससी शाळा सुरू करण्यात आल्या. गेल्या चार वर्षात मुलांना मोफत शिक्षण देण्यात आलं. मात्र हेच शिक्षण आता महाग झालं आहे. यावर्षीपासून पालकांना प्रतिमाह 1 हजार रुपये शैक्षणिक शुल्क लावणार असल्याची घोषणा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केली. मात्र त्याला आता विरोध होत आहे. हे शुल्क भरायचं कसं, असा प्रश्न यानिमित्तानं पालकाकडून विचारण्यात आला.
चार वर्षात मिळाला चांगला प्रतिसाद :शहरी भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी महापालिकांच्या शाळा कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा शाळेतील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी सीबीएससी अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली. पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यानं दुसऱ्या वर्षी शाळांची संख्या वाढवण्यात आल्या. आजघडीला सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सहा शाळा सुरू आहेत. ज्यामधे जवळपास आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या मुलांना मोफत चांगलं शिक्षण मिळत असल्यानं पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. महानगर पालिकेच्या वतीनं शिक्षण मोफत देण्यात आलं. पुस्तक आणि गणवेश पालकांना विकत घ्यावा लागत होता. आधुनिक अभ्यासक्रम नाममात्र दरात मिळत असल्यानं पालकांनी आनंद व्यक्त केला. मात्र या वर्षी पालकांना अचानक एक हजार रुपये प्रतीमहिना भरण्यास सांगण्यात आल्यानं पालकांनी रोष व्यक्त केला. परिस्थिती नसल्यानं पैसे भरायचे कसे, असा प्रश्न उपस्थितीत करत पालकांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं.