पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं आता वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा झाल्यापासाून पार्थ पवार सातत्यानं प्रचार करताना दिसत आहेत. मध्यंतरी त्यांनी गुंड गजानन मारणे यांचीसुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची समजूत घालणार असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांना द्यावं लागलं होतं.
मध्यंतरी पार्थ पवार प्रचारातून गायब झाले होते. त्यावरसुद्धा अजित पवार यांनी ते गनिमी काव्यानं प्रचार करीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला होता. तसेच कार्यकर्त्यांना फोन करून धमकावलं जात असल्याचंही म्हटलं होतं.
विरोधकांना मिळाला आयता मुद्दा-काही दिवसापूर्वीच आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. मात्र सरकारने आणि पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र पार्थ पवार यांनी कुठलीही मागणी केली नसताना अचानक सरकारकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे विरोधकांना निवडणुकीमध्ये टीका करण्यासाठी आयताच मुद्दा मिळाला आहे.एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं प्रशासनासमोर आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अशातच उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पार्थ यांना सुरक्षा दिल्यावरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, जर गरज असेल तर सुरक्षा द्यावी. शानशौकतसाठी वाय प्लस सुरक्षा देण्यात यावी.
काय असते वाय प्लस सुरक्षा?अतिमहत्त्वाच्या आणि जीवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून वाय प्लस सुरक्षा पुरविली जाते. वाय प्लस सुरक्षेत ११ जवानांचा समावेश असतो. त्यात दोन ते चार सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ कमांडो आणि पोलिसांचा समावेश असतो. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून सुरक्षा पुरविण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेत वेळोवेळी बदल करण्यात येतात.
हेही वाचा-
- विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करु शकतो, मात्र...; काय म्हणाले अजित पवार - DCM Ajit Pawar
- "अजित पवार यांच्या समर्थकांसह गुंडाकडून प्रचार करणाऱ्यांना धमक्या, जास्त धमक्या तेवढं...",- रोहित पवारांनी सांगितलं समीकरण - Baramati lok Saba election 2024