कोल्हापूरSwapnil Kusale : तब्बल 72 वर्षाचा वैयक्तिक पदकाचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी कांस्यपदक पटकावत साता-समुद्रापार तिरंगा फडकवला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्याच्या गावी कांबळवाडीत जल्लोषाला उधाण आलंय. ऑलम्पिक स्पर्धेत कास्यपदक पटकवल्यानंतर स्वप्नीलची आई अनिता कुसाळे यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलंय. यावेळी त्यांनी स्वप्निल घरी आल्यावर लाडक्या लेकासाठी आवडती बाजरीची भाकरी तसंच मेथीची भाजी, असा खास बेत करणार असल्याचं सांगितलं.
ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी :पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अगदी अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमस स्वप्निल कुसाळे यांनी चमकदार कामगिरी करत कास्यपदक पटकावलं. त्याच्या यशानंतर त्यांच्या कुटुंबानं आनंद व्यक्त केला. स्वप्निल यांच्या आईला अश्रू थांबत नव्हते, तर आजी तुळसाबाई यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा अखंड जप सुरू ठेवला होता. अंतिम सामन्यानंतर कांस्य पदक मिळवल्याचं समजताच कुटुंबाच्या आनंद गगनात मावेनासा झाला. आजीनं आपल्या नातवाला गोंजारणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. स्वप्नीलच्या घवघवीत यशानंतर सगळं कुटुंब भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.