छत्रपती संभाजीनगर :परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमांवर टाकला. हा अहवाल पुढं आल्यानं पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आंबेडकरी अनुयायांकडून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
तरुणाच्या शवविच्छेदन अहवालावरुन प्रश्न :घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशी याचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल दोन ते तीन तासात समोर आला. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तो अहवाल सोशल माध्यमावर पोस्ट केला. हा शवविच्छेदन अहवाल आता समाज माध्यमांवर चांगलाच फिरवला जातोय. त्यानुसार पोलिसांच्या ताब्यात असताना तरुणाला नेमकं झालं काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईबाबतच संशय व्यक्त केला आहे.
घाटी रुग्णालयात शवविच्छेदन :परभणी जिल्ह्यात हिंसाचार झाल्यावर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यामधे वकिली शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा देखील समावेश होता. अचानक त्याचा मृत्यू झाल्यानं पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला गेला. त्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी आंबेडकरी संघटनांनी मोठी गर्दी तिथं केली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सर्वांची मनं हेलावणारा होता. संविधानाचा अवमान करणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस संरक्षण आणि ज्यांची काही चूक नाही अशा युवकाला मारणं हा कुठला न्याय, असा जाब सोमनाथच्या आईनं विचारला. सोमनाथचा मृतदेह परभणीकडं जात असताना रस्त्यात अनेक कार्यकर्त्यांनी अँब्युलन्स अडवत त्याचं अंत्यदर्शन घेतलं.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :सोमनाथच्या मृत्यूच्या घटनेच्या विरोधात राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदची हाक दिली. सोमनाथ सूर्यवंशी याचं पार्थिव परभणीकडं रवाना झालं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. क्रांतीचौक भागात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं घटनेची जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला. काही वेळेसाठी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केलं.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
- "विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार", प्रकाश आंबेडकरांचा दावा
- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात दाखल