परभणी :मुलगा हवा असलेल्या पतीनं बायकोला तिन्ही मुलीच झाल्यानं या नाराजीतून पत्नीला जिवंत जाळल्याची घटना या पुरोगामी महाराष्ट्रातील परभणी शहरात घडली. मृत महिलेच्या बहिणीनं दिलेल्या तक्रारीनंतर, नराधम पती विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे हत्याकांड प्रकरण: तक्रारदार बहीण आणि मृत महिला या शेजारीच राहतात. आपल्याला मुलगा का होत नाही, तिन्ही मुली कशा झाल्या म्हणून महिलेचा नवरा तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्यांचं भांडण अनेकदा तक्रारदार बहिणीने सोडवलं होतं. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत महिला ओरडत घराबाहेरील रस्त्यावर आल्यानं तक्रारदार बहिणीनं घराबाहेर येऊन पहिलं असता, पेटलेल्या अवस्थेत त्यांना त्यांची बहीण दिसली. त्यावेळी ती एका दुकानामध्ये शिरली आणि मला वाचवा म्हणून पळत होती, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मृत महिलेचा पती तेथून पळून जाताना दिसल्याचा दावा त्यांच्या बहिणीनं केला. गंभीर जखमी झालेल्या माहिलेला त्वरित सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेलं असता शुक्रवारी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.