महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॉटेलमध्ये आवडीनं पनीर खाणाऱ्यांनो सावधान! थेट मंत्र्यांनीच सांगितलं कसं बनतं पनीर - RADHAKRISHNA VIKHE PATIL ON PANEER

राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये मिळणारे पनीर (Paneer) हे दुधापासून नव्हे, तर वनस्पती तेलापासून बनलेले असते. असा खळबळजनक दावा मंत्री विखे पाटील यांनी केला.

Radhakrishna Vikhe Patil On Paneer
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 3:44 PM IST

नाशिक : नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आयोजित कृषी महोत्सवात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी "हॉटेलमध्ये मिळणारे पनीर (Paneer) दुधापासून नव्हे, तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होतं," असा खळबळजनक दावा केला.

हॉटेलमध्ये मिळणारं पनीर दुधापासून नव्हे, तर...: कृषी महोत्सवात विखे पाटील म्हणाले की, "दूध उत्पादनात पुढील दीड वर्षात सर्वात मोठं आव्हान असणार आहे. गुजरातचा एक समुह आपल्याकडून दूध विकत घेतो म्हणून दूध संकलन टिकून आहे. आता दुधापासून पनीर तयार होत नाही. हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होतं." त्यामुळं दुधपासून बनलेलं पनीर खरेदी करा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. तसेच नाशिकमध्ये सर्वात जास्त बोगस कीटकनाशके तयार होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. रासायनिक खतांचा परिणाम नव्या पिढीवर होत आहे. यामुळं कर्करोगाचा आजार वाढतोय. जैविक खताचा वापर केला पाहिजे, असं विखे पाटील म्हणाले.

कांदा उत्पादकांना हमीभाव दिला पाहिजे : "कांदा उत्पादकांना हमीभाव दिला पाहिजे. आपल्याकडं कांद्याला आणि उसाला कमी भाव मिळाला की, रास्ता रोको करतात. मात्र इतर विषयाकडंही लक्ष घातलं पाहिजे. सर्वाधिक कष्ट करणारा शेतकरी वर्ग आहे. जिथे इच्छाशक्ती आहे तिथं काम करुन दाखवलं पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे," असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

सर्वांगीण विकास व्हावा : "देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 65.53 टक्के लोक गाव-खेड्यात राहतात. तर भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळं खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतानं विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. शहरांची झपाट्यानं प्रगती झाली. गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडं स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजानं शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव. आपल्या गावचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी सरपंच हा अतिशय महत्त्वाचा असून एक जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व गावात असायला हवं," असं छगन भुजबळ म्हणाले.


हेही वाचा -

  1. सावधान! बाजारात बनावट पनीर; अशी ओळखा भेसळ - How To Identify Fake Paneer
  2. Adulterated Paneer Seized : भेसळयुक्त पनीर साठा जप्त, दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाची कारवाई
  3. Raid On Paneer Factory Pune ऐन सणात चक्क बनावट पनीरचा पुण्यात कारखाना, कारवाईत २२ लाखांचा साठा जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details