कोल्हापूर :देवाचं नामस्मरण करता करता मरण यावं असं म्हणतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडलीय. मात्र या घटनेत मोठा ट्विस्ट आहे. कसबा बावड्यात नेहमीप्रमाणेपंढरीच्या विठुरायाचं नामस्मरण करत असताना अचानक बसल्या जागी पांडुरंग उलपे यांना घाम येऊन हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी धावाधाव करून कुटुंबीयांनी पांडुरंग यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरा पांडुरंग त्यांची हालचाल थांबल्यानं (Pandurang Ulpe) त्यांना घरी न्यायला सांगितलं. घरी अंत्यविधिची सगळी तयारी करण्यास सुरुवात झाली. मात्र वाटेतच जणू चमत्कार घडला. रुग्णवाहिकेत त्यांच्याजवळ बसलेल्यांना त्यांची हालचाल जाणवली. त्यांनी मग ताबडतोब जराही वेळ न घालवता पांडुरंग उलपे यांना पुन्हा दवाखान्यात नेलं.
काळ आला होता पण वेळ नाही :घरी तर पै पाहुण्यांकडून आणि उलपे कुटुंबीयांकडून अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती. पण रुग्णवाहिकेतून तात्यांना घरी आणताना रस्त्यातील खड्ड्यामुळे ॲम्ब्युलन्सला धक्का बसला आणि पांडुरंग यांच्या शरीराची हालचाल झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णवाहिका थेट हॉस्पिटलकडं वळवली. यावेळी डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. पांडुरंग यांच्या जणू जीवात जीव आला होता. साक्षात पांडुरंगाची कृपा झाली आणि 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' अशीच काहीशी स्थिती पांडुरंग रामा उलपे यांच्याबाबत झाली. दवाखान्यात दाखल केल्यावर पांडुरंग यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत सुरू झाले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
जप करताना आला हृदयविकाराचा झटका :पंढरपूरच्या विठुरायाची सेवा करणारे वारकरी संप्रदायातील पांडुरंग उलपे पत्नी बाळाबाई यांच्यासोबत मळ्यात राहतात. दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करणारे पांडुरंग हे सोमवारी संध्याकाळी घरीच अखंड हरिनामाचा जप करत बसले होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अंगाला घाम आला आणि काही क्षणातच ते बसल्या ठिकाणी कोसळले. पत्नी बाळाबाई यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरड करून शेजाऱ्यांना बोलावलं आणि तत्काळ शेजाऱ्यांनी गंगावेश येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान पांडुरंग यांची हालचाल बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितलं, अशी माहिती नातू ओंकार रामाने यांनी दिली.