पालघर : कोकणातील विविध जिल्ह्यांत मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे. या दोघांनी अनेक गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. पालघर जिल्ह्यात केळवा पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा २६ जानेवारीला दाखल झाला होता. वैतरणा रेल्वे पुलाच्या जीटीवरून २५ तारखेला सकाळी आठ ते सायंकाळी चार दरम्यान अॅक्टिवा स्कुटी चोरीस गेली होती. या चोरीचा तपास स्थानिक पोलीस तसंच गुन्हे अन्वेषण विभाग करीत होता.
तांत्रिक माहितीच्या आधारे यश :पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पोलीस उपाधीक्षक, अभिजीत धाराशिवकर यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत मार्गदर्शन केलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या गुन्ह्याचा समांतर तपास करत होता. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तसंच तांत्रिक माहितीचा वापर करून या प्रकरणातील आरोपी विशाल रघुनाथ नाईक (वय ३६, रा. सांची सोसायटी नालासोपारा) तसेच देवा लक्ष्मण थापा (वय ३५, रा. ईशान कॉलनी, नालासोपारा, मूळगाव डोंगलन जिल्हा काठमांडू, नेपाळ) या दोघांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल (क्रमांक एम एच ४८ डीएफ ७४४) आणि अॅक्टिवा स्कुटी (क्रमांक एम एच ४८ सी व्ही ६६ ३८) असा ८० हजार रुपये किंमतींचा ऐवज जप्त केला.