पालघर Lok Sabha Election 2024 :पालघर लोकसभा मतदारसंघात सरासरी 61 टक्के मतदान झालंय. यावेळी मतदान करण्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असला, तरी मतदार यादीतील सुमारे दीड लाख लोकांची नावं गायब असल्याचं उघडकीस आलंय. नवमतदार उत्साहानं मतदानासाठी आले होते. पण यावेळी मतदार याद्यांमध्ये गंभीर दोष आढळले. त्यामुळं मतदार याद्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये.
नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. नालासोपारा मतदारसंघातून 1 लाख 9 हजार 69, तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55 हजार 332 मतदारांची नावं काढून टाकण्यात आलीय. त्यामुळं पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत असल्याचं मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केलंय.
बहुजन विकास आघाडीचा रडीचा डाव : मतदार यादी अद्ययावत करताना निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आणि मतदात्यांना कल्पना देण्यात येत असते. त्यानुसार आपण सुचविलेल्या दुरुस्ती झाल्या आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष अथवा मतदारांचीच असते. परंतु, बहुतांश वेळा ही जबाबदारी ते योग्यपद्धतीनं पार पाडत नाहीत. परिणामी सदोष नावं काढून टाकण्यात किंवा वगळण्यात येतात. अशा चुका कोणी जाणीवपूर्वक करत नाही. त्यामुळं बहुजन विकास आघाडीनं केलेल्या आरोपात तथ्य नाही. किंबहुना त्यांचा हा रडीचा डाव आहे, अशा शब्दांत शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी बहुजन विकास आघाडीच्या अज्ञानपणाची खिल्ली उडवली.