अमरावती Shankar Baba Papalkar : कोणी सतत हसत आहेत, तर कोणी रडत आहे. कुणाला जेवण काय हे देखील माहिती नाही तर शौच केल्याचंही त्यांन भान नसंत. यांना जन्म देणाऱ्यांचाही पत्ता नाही. असं असलं तरी शंकरबाबा पापळकर नावाच्या संत रुपी पुरुषाचा अशा अनेक मतिमंद मुलांसह मूकबधिर, कर्णबधिर, दृष्टीहीन मुलांना आधार मिळतो आहे. यांच्यासोबतच अनेक अनाथांचा नाथ होण्याची जबाबदारी देखील शंकरबाबा पापळकर यांनी 30- 35 वर्षांपासून स्वीकारली आहे. सर्वसामान्यांना अशा मुलांकडं पाहणं देखील अशक्यच आहे. मात्र, या साऱ्यांची आई होऊन हे अनाथ, मतिमंद देखील समाजाचे घटक आहेत. त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या परतवाडा येथील शंकरबाबा पापळकर यांनी मेळघाटच्या पायथ्यालगत वझ्झर या ठिकाणी अनाथ मतिमंदांचे आगळे वेगळे विश्व निर्माण केलं आहे. शासनाच्या नियमानुसार कुठल्याही आश्रम शाळेत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांना ठेवू नये असा नियम आहे. मात्र, आपल्या देशात वर्षाला एक लाख मुलं, मुली विकल्या जातात. अशा गंभीर परिस्थितीत या अनाथ मतिमंदांचे काय होत असेल? असा सवाल नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले शंकरबाबा पापळकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना उपस्थित केलाय.
शून्यात आनंदाचा शोध : शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात आज 123 मुली आहेत. यापैकी बोटावर मोजण्या इतक्या सोडल्या तर इतर सर्व विकलांग आहेत. मूकबधिर असणाऱ्या दोन मुली या आश्रमातील सर्व मुला-मुलींसाठी स्वयंपाक बनवतात. चूल पेटवणं, गॅस शेगडी सुरू करणं हे सारं काही त्या स्वतः करतात. एक मूकबधिर युवती सर्व भाजीपाला चिरून देते हे तिचे नित्याचं आणि आवडीचं काम. दोघी-तिघी मतिमंद आणि मूकबधिर असणाऱ्या मुलींना सर्वांचे ताट धुण्यात आनंद मिळतो. विशी पार केलेल्या दोन मतिमंद मुली या एकमेकींशिवाय जेवणच करत नाहीत. यापैकी एक मुलगी तिच्या मैत्रिणीला स्वतः हाताने घास भरवते. तिचं जेवण झाल्याशिवाय ती स्वतः जेवणच करत नाही. एकमेकींना त्यांच्या भावनेनुसार समजून घेत या दोघींचे जेवण तास-दीड तासापर्यंत चालते. एकीने जर जेवण केलं नाही तर दुसरी अन्नाला देखील शिवत नाही. मतिमंदांनाही भावना असतात त्यांच्यातही प्रेम, जिव्हाळा असतो. शून्यात देखील एक आगळावेगळा आनंद निर्माण करण्याचा शंकरबाबा पापळकर यांच्या या प्रयत्नापुढं पद्मश्री सारखा सन्मान देखील थिटाच जाणवतो.
16 मतिमंद मुलांना फीटचा आजार: शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात असणाऱ्या 16 मतिमंद मुलांना फिटचा गंभीर आजार आहे. फिट आल्यामुळं काय त्रास होतो याची जाणीव या मतिमंद मुलांना देखील झाली आहे. यामुळं ते स्वतःच फिट येऊ नये यासाठी त्यांना दिलेले औषध गोळ्या नित्यनेमानं घेतात. हे अनाथ मतिमंद युवक युवती आश्रमातून बाहेर पडले आणि त्यांना अशी फिट आली तर त्यांचं काय होईल त्यांच्या मदतीसाठी कोण धावणार हे सारं काही फार कठीण असल्याचं शंकरबाबा पापळकर यांनी सांगितलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलणारच :अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मतिमंद मुलांना आश्रम शाळांमध्ये ठेवूनच त्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी कायद्याची निर्मिती व्हावी अशी माझी अनेक वर्षांपासून मागणी आहे. आता पद्मश्री पुरस्कार मला मिळाला असला तरी, या पुरस्कारापेक्षाही या मुलांच्या भवितव्यासाठी खास कायदा व्हावा हे मला अधिक महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझी लवकरच भेट होईल. या भेटीदरम्यान देशभरातील अशा अनाथ मतिमंदांना कायमस्वरूपी आधार मिळावा असा कायदा व्हावा याबाबत मी त्यांच्याकडं मागणी करणार असल्याचं शंकरबाबा पापळकर यांनी सांगितलं.