नागपूर Mohan Bhagwat On Bangladeshi Hindu : देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळीच विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात RSS ध्वजारोहण केलं. यावेळी बोलताना त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवर भाष्य केलं. "बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत आहेत. मात्र बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे."
बांगलादेशातील हिंदूंना केलं जात आहे टार्गेट :भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या आंदोलनामुळं तणावाचं वातावरण आहे. तेथील हिंदूंना टार्गेट केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यावर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं. "शेजारील देशात मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. चूक नसतानाही याची झळ तिथं राहणाऱ्या हिंदू बांधवांना बसत आहे. बांगलादेशात असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे. सरकार आपलं काम करेलच. मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे. देशात योग्य आणि शांततेचं वातावरण निर्माण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे," असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.