खुल्या कारागृहाचा सुधारगृहाकडे प्रवास; कैदी करतायत शेती, भाज्यांची विक्री आणि बरंच काही अमरावती Open Prison in Morshi :मोर्शी येथे 1 फेब्रुवारी 2008 ला विदर्भातील पहिलं खुलं कारागृह सुरू झालं. राज्यात मोर्शीसह पैठण, सांगली जिल्ह्यातील आटपाटी आणि पुणे जिल्ह्यातील येरवडा या ठिकाणी खुले कारागृह आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात कैदींची क्षमता 300 इतकी आहे. सध्या या कारागृहात 166 कैदी आहेत. या कारागृहात एकूण 53 अधिकारी कर्मचाऱ्यांची मान्यता असून सध्या घडीला या ठिकाणी 35 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती खुल्या कारागृहाचे प्रभारी अधीक्षक ज्ञानेश्वर खरात यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली.
कारागृहाच्या आतमधील वातावरण हे सुधार गृहासारखं असावं यासाठी आम्ही कारागृहात उद्यान तयार करण्यात आलं आहे. कैद्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी हवे ते सर्व प्रयत्न अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कारागृहाला सुधारगृहाचे स्वरूप आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील ज्ञानेश्वर खरात यावेळी म्हणाले.
कैद्यांनी 35 एकर शेतात गव्हासह भाज्यांचे घेतले उत्पादन :मोर्शी येथील खुल्या कारागृहालगत अप्पर वर्धा प्रकल्पातील 23.28 हेक्टर जमीन हेक्टरी 1 हजार रुपये भाड्याने देण्यात आली आहे. यापैकी 35 एकर पैकी 7 एकर जमिनीवर खुल्या कारागृहातील कैदींनी गव्हाची लागवड केली असून तीन एकर जमिनीवर कांदा, सहा एकर जमिनीवर मोहरी यासह सहा एकर जमिनीवर आंतर पीक घेतलं आहे. यासोबतच कोबी, टोमॅटो, पालक, मेथी अशा सर्व प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन देखील या ठिकाणी घेतलं जात आहे. तसंच या भाज्यांची विक्री कैदी कारागृहाच्या बाहेर करतात.
हॉटेलमध्ये गॅरेजही सुरू :खुल्या कारागृहातील कैद्यांमध्ये जे काही कला गुण आहेत, त्याप्रमाणे त्यांचे विविध कामात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारागृहाच्या बाहेरच करागृह प्रशासनाने हॉटेल सुरू केलं असून ह्या हॉटेलमध्ये समोसा, कचोरी यासह अगदी गरम जिलेबी कैद्यांकडूनच तयार केली जाते. मोर्शी ते अप्पर वर्धा धरणाकडे जाणाऱ्या अनेकांसाठी हे हॉटेल खास पसंतीचे झाले आहे. तसंच या कारागृहासमोर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज देखील सुरू करण्यात आले आहे.
व्यवसाय करणाऱ्या कैद्यांसाठी खास गणवेश :मोर्शी येथील खुल्या कारागृहात बंद्यांना सर्वसामान्य कारागृहाप्रमाणेच पांढऱ्या रंगाचा गणवेश आहे. असं असलं तरी हॉटेलमध्ये काम करणारे आचारी तसंच इतरांना लाल रंगाचा खास गणवेश देण्यात आला आहे. गॅरेजमध्ये काम करणारे बंदी देखील लाल रंगाचा गणवेश परिधान करून असतात. कारागृह प्रशासनाच्या वतीनं कैद्यांच्या आवडीच्या कामांचं प्रशिक्षण त्यांना कारागृहातच दिलं जात असल्याची माहिती देखील ज्ञानेश्वर खरात यांनी दिली.
कारागृहात फड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती :कारागृहात कैद्यांकडून मोठ्या प्रमाणात फड्यांची (झाडू-खराटा) निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे या खुल्या कारागृहात तयार होणाऱ्या फड्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात मोठ्या संख्येने जातात. येणाऱ्या काळात राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये आमच्या कारागृहात तयार करण्यात आलेले फडे आम्ही पाठवू असे देखील कारागृहाचे प्रभारी अधीक्षक ज्ञानेश्वर खरात यांनी सांगितले.
खुल्या कारागृहात 35 गायी आणि 12 बैल :या खुल्या कारागृहामध्ये एकूण 35 गाई आणि 12 बैल आहेत. या गाईंचे दूध काढले जात नाही. मात्र गोमूत्र आणि शेणापासून कारागृहात खत निर्मिती केली जात आहे. दर्जेदार शेणखत आणि गांडूळ खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल असे कारागृहाचे प्रभारी अधीक्षक ज्ञानेश्वर खरात यांनी सांगितले.
कारागृहातील कैदींना असा मिळतो कामाचा मोबदला : खुल्या कारागृहात जो काही उपक्रम चालतो त्याचा उद्देश हा कैदींच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरावा असाच आहे. या कारागृहात शिक्षा भोगून 14 वर्ष पूर्ण झालेल्या कैदींना सोडलं जातं. यासह ज्यांचं वय 65 वर्षांच्या वर अशांनाही सोडलं जातं. गतवर्षी पाच कायद्यांना या कारागृहातून मुक्त करण्यात आले. कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांना रोज 94 रुपये मोबदला दिला जातो. अर्धकुशल आणि कुशल बंदींना यापेक्षा थोडी कमी रक्कम दिली जाते.
हेही वाचा -
- तुरुंगात झाडू मारुन मुस्लिम कैद्यानं राम मंदिरासाठी जमविले 1100 रुपये, केंद्रीय मंत्री झाल्या भावुक
- माजी मंत्री सुनील केदार यांचे कारागृहाबाहेर येताच शक्तिप्रदर्शन
- पोलिसांच्या हाताला झटका मारत संशयित आरोपीचं पलायन, शोधासाठी दोन पथकं रवाना