सोलापूर Onion Prices Fell : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं आज (25 जानेवारी) कांद्याचे दर जबरदस्त घसरले होते. (Solapur APMC) मार्केट यार्डात आलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. (Agricultural Produce Market Committee) यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्येही रोषाचं वातावरण दिसून आलं.
शेतकऱ्यांकडून व्यथा मांडण्याचा प्रयत्न :केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीचं मुख्य प्रवेशद्वारच बंद करून वाहतूक कोंडी केली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केलं. गुरुवारी दिवसभर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
दोन हजार गाड्यांची आवक झाल्यानं कांद्याचे दर घसरले :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. जवळपास दोन हजार गाड्यात कांदा भरून शेतकऱ्यांनी कांदा आणला. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं कांदा दर दोन ते तीन रुपये प्रतिकिलो मिळाला आहे. एका एकरात कांदा उत्पादन करण्यासाठी जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो. तर कांदा विकून हातात तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.