मुंबई Mumbai Youth Died Eating Shawarma : शोरमा खाल्ल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल 12 जणांना विषबाधा झाली. ही खळबळजनक घटना मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये घडली. प्रथमेश भोकसे असं मृत तरुणाचं नाव आहे. "या घटनेत एका मुलीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केलं आहे," अशी माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिली. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे. या खाद्यविक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून हा शोरमा खाल्यानं नागरिकांना विषबाधा झाली.
शोरमा खाल्ल्यानं 10 ते 12 जणांना विषबाधा :मानखुर्दमध्ये रस्त्यावर तयार केलेला शोरमा खाल्ल्यानं परिसरातील 10 ते 12 जणांना विषबाधा झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एका 19 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. प्रथमेश भोकसे ( वय 19 ) असं मृत तरुणाचं नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उपचारादरम्यान प्रथमेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात मृत तरुणाचा मामा हमीद अब्बास सय्यद ( वय 40 ) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन शोरमा विक्रेत्यांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन शोरमा विक्रेत्यांना अटक :ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांची शोरमा विक्रीची गाडी आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या गाडीवरुन शोरमा खाल्ल्यानं अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी आल्या. दहा ते बारा जणांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्यापैकी चार जणांची अधिकृत माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली.
उपचारादरम्यान प्रथमेशचा मृत्यू :"प्रथमेशसह परिसरातील अनेकांनी तीन मेला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कांबळे आणि शेख यांच्या गाडीवरील शोरमा खाल्ला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रथमेशला उलटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला तात्पुरतं बरं वाटलं, मात्र पाच मे रोजी सकाळी पाचच्या सुमारास पुन्हा जास्त त्रास होऊ लागल्यानं त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान प्रथमेशचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणं इतर विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असून ऐश्वर्या नावाच्या मुलीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत," अशी माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिली.
हेही वाचा :
- कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; शिकवणी वर्गात 500 विद्यार्थी घेत होते NEET, JEE ची शिकवणी - Students Suffer Food Poison
- Police Trainees Suffer Food Poison : धुळ्यात 70 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल
- पुण्याकडं येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रवाशी संघटनेची मागणी