पुणे : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा समजाचे विविध शहरात मोर्चा काढले जात आहेत. अश्यातच परभणी इथल्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानावर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर पोली ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत या नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगेंच्या अटकेसाठी ओबीसी नेत्यांचं पुण्यात आंदोलन :पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर सोमवारी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले की, "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जातीयवादी विधान केलं आहे. ओबीसी आणि वंजारी समाजाला ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं आहे, ते चुकीचं आहे. मनोज जरांगे यांच्याकडून घरात घुसण्याची भाषा करण्यात येत आहे. कोणाच्या घरात घुसून काय करणार आहे, हे त्यांनी सांगावं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ आता संपूर्ण राज्यभर मनोज जरांगे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे."