नागपूर Lok Sabha Election 2024 : मी कधी जात, धर्म, पंथ, पक्ष बघत नाही. सर्वांचं काम करतो, म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते माझ्याकडं येतात. काँग्रेसच्या एका नेत्याला अटकेपासून संरक्षण मी दिलं होतं. तो नेता आज माझ्या विरोधातील प्रचाराला सर्वात पुढं दिसत असल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली आहे. मात्र, यावर माझा कोणताही आक्षेप नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते आज नागपुरात बोलत होते. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर तो काँग्रेस नेता कोण यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होणार :नागपूर शहरातील पायाभूत सुविधांना अधिक सक्षम करून शहराला शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या क्षेत्रात संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसंच देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला आहे.
दहा वर्षांत 1 लाख कोटींची कामे झाली : नागपूर शहरात विविध ठिकाणी फूड झोन तसंच फुटाळा येथे २५ रेस्टॉरेन्ट, हॉकर्स झोन, ऑरेंज सिस्टी स्ट्रीटवर फ्रुट, व्हेजिटेबल झोन, वर्धा रोडवर सेंद्रीय धान्य, भाजी बाजार हे प्रकल्प होणार आहेत. याशिवाय होलसेल किराणा मार्केटसाठी कळमना परिसरात जागा दिली असून त्याचंही बांधकाम सुरू झालं आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. 19 कोटी रुपये खर्चून महाल येथील कल्याणेश्वर मंदिराचं कॉम्प्लेक्स 1 हजार 200 कोटी रुपये खर्चून सिंदी येथे लॉजिस्टीक्स पार्क, शहरात 4 ठिकाणी ट्रक टर्मिनल देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहराचा सर्वांगीण विकास होत असून गेल्या दहा वर्षांत 1 लाख कोटींची कामं झाली आहेत. काही कामं सुरु आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. नागपूर शहरासाठी आगामी पाच वर्षासाठी नव्या महत्वाकांक्षी योजना आखल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहर नवं स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.