महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"विमानतळाची नवीन धावपट्टी एक महिन्यांत पूर्ण करा, अन्यथा कारवाई...", नितीन गडकरींनी दिला अल्टिमेटम - NAGPUR AIRPORT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामाला उशीर होत असल्याबद्दल मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

NAGPUR AIRPORT
नितीन गडकरी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 7:49 AM IST

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "एक महिन्याच्या आत काम पूर्ण करा, अन्यथा आता कारवाई करण्यात येईल," असा अल्टिमेटम नितीन गडकरी यांनी संबंधित कंपनीला दिला. या कामात उशीर झाल्यानं नागपूरकर प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याकरिता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

तिकिटांच्या दरात दुप्पट-तिप्पट वाढ :डिसेंबर 2023 मध्ये विमानतळ प्राधिकरणानं धावपट्टीच्या कार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 1 मे 2024 ला के. जी. गुप्ता कंपनीला या कामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र, अद्याप धावपट्टीचं काम पूर्ण झालेलं नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी नितीन गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळं सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत गडकरी यांनी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, मिहानच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी तसंच के. जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

नितीन गडकरींनी दिला कारवाईचा ईशारा (Source - ETV Bharat Reporter)

काम सुरू पण संथगतीनं : "कंपनीला मे 2024 मध्ये कार्यादेश मिळाल्यावर जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होतं. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. पहिल्या लेअरचं काम 80 टक्के पूर्ण झालं आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचं काम पूर्ण होण्यासाठी 21 मे 2025 पर्यंतचा कालावधी लागेल," असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं.

महिनाभरात काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई : नितीन गडकरी यांनी धावपट्टीचं काम संथगतीनं सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याचवेळी आणखी पाच महिने सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागणं योग्य नाही, याकडेही मिहान कंपनीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. "एक महिन्याच्या आत धावपट्टीचं काम पूर्ण करावं, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी," असा स्पष्ट इशारा गडकरी यांनी दिला आहे.

हेही वाचा

  1. ... म्हणून यशवंतरावांच्या सातारा जिल्ह्याची 'अशी' परिस्थिती, उदयनराजेंची काँग्रेस, शरद पवारांवर टीका
  2. उत्तुंग प्रतिभेचा दिग्दर्शक हरपला, श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त
  3. लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात; अवैधपणे करत होते वास्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details