मुंबई - सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि रणसंग्राम जोरात सुरू आहे. यातच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली पाहायला मिळतेय. तसेच उमेदवारी न मिळाल्यामुळं अनेक इच्छुकांमध्ये नाराजीनाट्य पसरले असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणात बंडाचे पडसादही उमटणार आहेत. यातच आता मागील काही दिवसांपासून आयाराम-गयाराम यांना ऊत आलाय. पक्षात सन्मानपूर्वक वागणूक किंवा तिकीट न मिळाल्यामुळं इच्छुक दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरत आहेत. अशाच आता माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना भाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ते बुधवारी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी स्वतः शिंदे गटातील पक्ष प्रवेशाची माहिती दिली.
भाजपात आदर अन् मान-सन्मान मिळाला :मी मागील काही दिवसांपासून भाजपा पक्षात काम करीत होतो. माझे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आम्ही राणे कुटुंब भाजपात चांगल्या पद्धतीने काम केलंय. या काळात मला भाजपा पक्षाने मानसन्मान आणि आदरपूर्वक वागणूक दिली. सर्व नेत्याने सांभाळून घेतले, असंही निलेश राणे म्हणालेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मला लहान भावासारखे सांभाळून घेतलं. त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. तसेच चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. भाजपा पक्ष सोडताना मला त्रास होतोय. पण हा निर्णय वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी घेतला असल्याचं यावेळी निलेश राणेंनी सांगितलं.