लातूर NEET Paper Leak Case : 'नीट' परीक्षा घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपी जलील पठाण यानं लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात एक कोटी रुपयांचा बंगला सहा महिन्यापूर्वीच बांधला आहे. तर शासकीय नोकरीत बढतीसाठी त्यानं जोडलेलं कर्णबधीर असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्रही आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याची गंभीर दखल घेत या प्रमाणपत्राच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
जलील पठाण जिल्हा परिषदेकडून निलंबित :'नीट' पेपर फुटीच्या प्रकरणात एटीएसनं अटक केलेला लातूरच्या कातपूर जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाण हा 2009 मध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हणून शासकीय सेवेत भरती झाला. काही वर्षानंतर त्यानं लातूर जिल्ह्यात बदली करून घेतली. प्रथमतः अहमदपूर आणि नंतर लातूर तालुक्यातील कातपूर इथं मुख्याध्यापक म्हणून रुजू होता. नांदेडच्या एटीएसनं त्याला अटक करताच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी त्याला निलंबित केलं. त्याचा पदभार काढून घेण्यात आला. निलंबन काळात त्याला निलंगा पंचायत समितीमध्ये हजेरी देण्यास सांगितलं आहे.
कर्णबधीर प्रमाणपत्र बोगस असल्याची शक्यता :आरोपी पठाण यानं शासकीय नोकरीत भरतीसाठी कर्णबधीर असल्याचं पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र जोडलं आहे. हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना असून ते प्रमाणपत्र पुणे येथील विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलं आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.