ठाणे :ही शेवटची निवडणूक आहे. शेवटची निवडणूक कधी होणार कुणास ठाऊक, असं भावनिक आवाहन अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या सभेत केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यानी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला त्यांच्या मांडीवर बसवलं. त्यांच्या मरणाची वाट तुम्ही पहात आहात. शरद पवार यांचं मरण तुमची इच्छा असल्याचं दिसतंय असा हल्लाबोल आव्हाडांनी अजित पवारांवर केलाय.
तिचंच कुंकू पुसायला निघालात : ज्या माऊलीनं आपल्याला पोटच्या पोरासारखं वाढवलं. तिचंच कुंकू पुसायला तुम्ही निघालात का? असा सवाल आव्हाड अजित पवारांना केला आहे. शरद पवार यांच्या मरणाची वाट बघणारे कलंकित अजित पवार महाराष्ट्रासह बारामतीकरांना कधीच आवडणार नाहीत, असदेखील आव्हाडांनी म्हटलं आहे. बारामतीसाठी मी 'हे' केलं, 'ते' केलं असं सांगणाऱ्या अजित पवारांना बारामती दिली कोणी?, अजित पवारांएवढा कृतघ्न माणूस कोणीच नाही, अशा शब्दात आव्हाडांनी आपला संताप व्यक्त केला.
मृत्यूसाठी प्रार्थना करणं कितपत योग्य :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांविषयी काढलेल्या उद्गारांचा आज आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. येणारी लोकसभा निवडणूक शेवटची असेल, असं भावनिक आव्हान करून मतं मागितली जातील. परंतु तुम्ही भावनिक न होता मला सहकार्य केल्यास 'मी' पुढच्या कामाला बांधील आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी आज बारामतीत केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय. एखाद्या माणसाच्या मृत्यूसाठी प्रार्थना करणं कितपत योग्य आहे, असा खरमरीत सवाल त्यांनी केलाय.
अजित पवारांनी आपली हद्द ओलांडली :शरद पवार यांचं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे दिग्गज नेतेदेखील नाव काढतात. मात्र, शरद पवारांविषयी असे उद्गार काढून अजित पवारांनी आपली हद्द ओलांडली आहे. मला तुमच्यासोबत काम केल्याची आज लाज वाटते, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री पवारांना लगावला आहे. शरद पवार देशाचे नेते असून अजित पवार यांना राज्यातदेखील कोणी ओळखत नाही. ज्या माऊलीनं तुम्हाला मोठं केलं, तिचंच कुंकू कधी पुसलं जाईल, अशी वाट पाहणे यापेक्षा घाणेरडं राजकारण महाराष्ट्रानं कधीच पाहिले नाही, असा प्रहार त्यांनी अजित पवारांवर केलाय.
- हे वाचलंत का :
भाजपा आमदार गणपत गायकवाड आणखी अडचणीत, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?
- एवढे दिवस वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका; अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन