मुंबई : आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पदाबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र अजित पवारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदानं आजपर्यंत हुलकावणी दिली आहे.
अजित पवार कायम उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत :उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनी पहिल्यांदा 2010 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पद भूषवलं. त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा काम पाहिलं. 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत होतं. त्यानंतर 2019 मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी 'बहुचर्चित' पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं हे उपमुख्यमंत्री पद औट घटकेचंच ठरलं. त्यानंतर राज्यात 2019 मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीत बंड करुन सत्तेत सहभाग :जुलै 2022 मध्ये सरकार पडल्यानंतर शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीनं मुख्यमंत्री पद मिळवलं. त्यादरम्यान अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. असं असताना 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. अशाप्रकारे अजित पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल पाच वेळा शपथ घेतली आहे. आज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा शपथ घेतील. असा विक्रम करणारे राज्यातील अजित पवार हे पहिलेच नेते आहेत. मात्र आजपर्यंत तब्बल पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या अजित पवार यांना अद्याप मुख्यमंत्री पद मिळू शकलेलं नाही. आजपर्यंत मुख्यमंत्री पदानं त्यांना सातत्यानं हुलकावणी दिली आहे.
- 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 71 जागा मिळाल्या. त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडं मुख्यमंत्री पद न घेता ते पद काँग्रेसला दिलं.
- 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं. यावेळी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजित पवार अतिशय आग्रही होते.
- 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फुटून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत आहे.
हेही वाचा :
- शपथविधीपूर्वी हायव्होल्टेज ड्रामा, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याकरिता एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू
- काही तासांत होणार शपथविधी तरी एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम: आमदार-खासदारांकडून दबाव?
- देवेंद्र फडणवीस घेणार शपथ: सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल, महत्त्वाचे मार्ग राहणार बंद