मुंबई Ajit Pawar :शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला; परंतु त्यानंतर झालेल्या प्रत्येक घडामोडी आणि काही महिन्यांच्या अंतरावर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार हे काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. मागील १० दिवसात अजित पवार यांनी दोनदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभेत महायुती म्हणून आम्ही एकत्र असलो तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानं अजित पवारांची पावलं महायुतीतून बाहेर पडण्याच्या दिशेने तर पडत नाहीत ना? असाही तर्क लावला जात आहे. याला कारण म्हणजे महायुतीचं विधानसभेसाठी होणारं जागावाटप हेसुद्धा आहे.
अजित पवार गटाकडून दबाव :मागील १० दिवसांच्या अजित पवार यांच्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवार हे महायुतीमध्ये दबाव निर्माण करत आहेत का? असं चित्र दिसून येतं. मागील १० दिवसात अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोनदा भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत फक्त ४ जागा त्यांच्या वाट्याला आल्या. त्यातसुद्धा बारामती सारख्या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. आता मागच्या दारानं राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावण्यात आली असली तरी लोकसभेमध्ये जो फटका बसला तो विधानसभेत बसू नये यासाठी अजित पवार सावध पावलं उचलताना दिसत आहेत.
अजित पवार गटावर नाराजी :अजित पवार गट महायुतीत आल्यानं त्याचा फटका लोकसभेत बसला असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या विवेक साप्ताहिक मधून सांगण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं भाजपा तसंच शिंदे गटाच्या अनेक आमदार, नेत्यांनी नाराजीसुद्धा दर्शवली होती. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्यावर असलेले सिंचनाचे आरोप, शरद पवार यांच्यासोबत दगा फटका केल्यानं पवार गटाला मिळणारी सहानुभूती या कारणानं अजित पवार महायुतीत नको असं उघडपणे जरी कोणी बोलत नसलं तरीसुद्धा अनेकांची ती मनापासून इच्छा आहे. त्यातच निधीवाटपावरून अजित पवारांचे भाजपा त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांशी वाद झाले आहेत. त्यात अजित पवार गटाचे आमदार सत्तेमध्ये असूनसुद्धा अनेक जण नाखूश आहेत.
भाजपाच्या उमेदवाराकडून धोका :लोकसभेला रस्सीखेच करून जेमतेम ४ जागा अजित पवार गटाला मिळाल्या होत्या. आता विधानसभेला किती जागा देतील यावर साशंकता आहे. लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होऊ नये म्हणून अजित पवार गटाकडून दबाव निर्माण केला जात आहे का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला अजित पवार यांच्यासोबत ४१ आमदार आहेत. त्यातील २० आमदार २०१९ या मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत पोहोचले आहेत. ८ आमदारांनी आता शिवसेना शिंदे गटासोबत असलेल्या उमेदवारांचा पराभव केला आहे. याचाच अर्थ अजित पवारांच्या ४१ आमदारांपैकी २८ आमदारांचा मुकाबला हा भाजपा आणि शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात होता.