कोल्हापूर Navratri 2024 :करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या (Karveer Nivasini Ambabai) दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. अनेक भक्तांकडून देवीला वेगवेगळ्या स्वरुपात वस्तू-अलंकार दान केले जातात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival 2024) पूर्वसंध्येला, खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली 'प्रभावळ' (Prabhaval) अर्पण करण्यात आली.
यापूर्वी श्री अंबाबाईला सुवर्ण पालखी अर्पण : 45 तोळे वजनाचे सोने प्रभावळसाठी वापरण्यात आले आहे. त्याची किंमत 35 लाख रुपये इतकी आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या शारदीय नवरात्रोत्सवापासून, ही प्रभावळ करवीर निवासिनी अंबाबाईच्या सालंकृत पूजेच्या सौंदर्यात भर घालणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली होती. त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता. आज हा संकल्प पूर्ण झाला.
श्री अंबाबाईला सुवर्ण प्रभावळ : 80 वर्षापूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर, ट्रस्टच्यावतीनं सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी 24 कॅरेटचे 450 ग्रॅम म्हणजेच 45 तोळे सोने वापरण्यात आले. चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्याहस्ते आणि महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीच्यावतीनं सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला.