नाशिकNashik Girl Molestation :मुंबईतील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी क्लास घेणार्या शिक्षकानं पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी संशयित कृष्णा दहिभाते यास अटक केली.
वर्गात इतर मुली नसल्याचा फायदा घेतला :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कृष्णा दहिभाते याचा सिडकोतील उपेंद्रनगर परिसरात ज्ञानेश्वरी क्लासेस नावाचा खासगी क्लास आहे. कृष्णा दहिभाते हा मुलांना इंग्रजी आणि विज्ञान विषय शिकवतो, तर त्याची पत्नी गणित विषय शिकवते. या क्लासमध्ये एक अल्पवयीन पीडित मुलगी गुरुवारी 22 रोजी नेहमीप्रमाणे क्लासला आली. यावेळी क्लासमध्ये इतर मुली नव्हत्या. वर्गात इतर मुली नसल्याचा फायदा घेत कृष्णा दहिभाते यानं अल्पवयीन मुलीला फळ्यावर कविता लिहिण्यास सांगितलं. कविता लिहित असताना या शिक्षकानं तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं.