सातारा - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी विराट शक्तीप्रदर्शन करत अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि महायुतीचे नेते आ. नरेंद्र पाटील उपस्थित राहिल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या.
लोकसभा निवडणुकीवेळी केला होता गंभीर आरोप : सातारा लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आ. शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले होते. त्यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबई मार्केट कमिटीतील गाळे आणि शौचालय घोटाळ्याचा गंभीर आरोप शशिकांत शिंदेंवर केला होता. आज त्याच आमदार नरेंद्र पाटलांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. तसेच त्यांच्या गाडीचं सारथ्य देखील केलं.
शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेंद्र पाटील होते उपस्थित होते (ETV Bharat Reporter) काय केला होता आरोप? :सातारा लोकसभा मतदार संघातील तुतारीचा उमेदवार हा नवी मुंबई मार्केट कमिटीच्या मुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांच्छनास्पद आहे. अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते, तर मग आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही', असा आरोप आणि टीका आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी केली होती.
कोरेगावात दोन शिंदेंमध्ये होणार अटीतटीची लढत :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आ. शशिकांत शिंदेंना कोरेगाव विधानसभेची देखील उमेदवारी दिली आहे. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 'स्वतःच्या पक्षाशी आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्याला कोरेगावची जनता आता जागा दाखवेल', अशी टीका आ. शशिकांत शिंदेंनी महायुतीचे उमेदवार आ. महेश शिदेवर केली.
हेही वाचा -
- महायुतीत भाजपा तर महाविकास आघाडीत काँग्रेसच 'थोरला भाऊ'; शरद पवार अजित पवारांवर पडले भारी
- सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "लढून जिंकण्यात जास्त..."