जाणून घ्या प्रतिक्रिया (Source- ETV Bharat Reporter) पुणे Narendra Dabholkar Case Verdict :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयानं दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवित जन्मठेपसह पाच लाखांचा दंड सुनावला आहे. तर पुराव्याअभावी विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी वीरेंद्र सिंह तावडे याच्यावर कट रचल्याचा आरोप होता. परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळं तावडेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसंच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळं त्यांनाही निर्दोष ठरवलं गेलंय. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले. त्यामुळं या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया :पुणे सत्र न्यायालयाच्या निकालावर नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " विचारवंतांना असलेला धोका अजून संपलेला नाही. माणसांना संपवून विचार संपविता येत नाही. ज्या विचारधारेच्या लोकांवर संशय होता, त्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी. तिन्हा आरोपींच्या सुटके विरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत."
काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर? : नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनीही न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली. "गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सचिन अंदुरे, शरद कळसरकर यांना अटक झाली होती. हा तपास एका टप्प्यावर थांबला होता. आज आम्हाला असं वाटतंय की जे खरे शूटर्स होते, त्यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 11 वर्षांची ही लढाई महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक यांनी लावून धरली होती. त्यामुळं 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गानं जाऊन न्याय दृष्टीपथात येतो ही भावना आमच्या मनात जागृत राहिली आहे. ज्या दोन आरोपींना शिक्षा झाली, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र, ज्या तिघांना निर्दोष सोडण्यात आलं त्यासंदर्भात आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ", असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा -
- सुप्रीम कोर्टाचा निर्णय, नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात न्यायालयीन देखरेख आता नको
- Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण, गुन्हेगार मात्र मोकाटच; अंनिसची पुण्यात मूक मोर्चा रॅली
- Pawar Raut Threat Case: शरद पवार, संजय राऊत धमकी प्रकरण: गुन्हे दाखल, तपास सुरू