मुंबई :केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राणे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत असल्यानं ही भेट महत्वाची मानली जातेय.
मराठा आरक्षण अध्यादेशावरून नाराजी : नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या अध्यादेशावरून नारायण राणे नाराज आहेत. हा नाजूक प्रश्न असून सरकारनं याचा सखोल विचार करावा. तसेच स्वाभिमानी मराठा कधीही कुणबी समाजामध्ये समाविष्ट होत आरक्षण घेणार नाही, असंही ते म्हणाले होते. परंतु जर असं झालं तर हा मागासवर्गीय समाजावर अन्याय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सीटचा वाद : नारायण राणे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण होत असून त्यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणलं जाईल की, त्यांना लोकसभेत पाठवलं जाईल, यावर भाजपामध्ये मंथन सुरू आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे सुद्धा भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. अशा परिस्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला दिली जाते, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. या जागेवरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा इच्छुक असल्यानं यावरून सध्या भाजपा आणि शिंदे गटांमध्ये रस्सीखेच जारी आहे. आजच्या या भेटीदरम्यान यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे वाचलंत का :
- 'वंचित'चा महाविकास आघाडीत अधिकृत समावेश; प्रकाश आंबेडकरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
- लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?