नागपूर Nana Patole on BJP MLA Firing : कल्याणचेभाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. यानंतर यावरुन सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सरकारवर टीका करत, पोलिसांवर भयानक दबाव आहे. कायद्यानं कुठल्याही पोलिसांनी कामं करु नये, अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृह मंत्र्यांकडून वापरलं जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते आज नागपूरमध्ये बोलत होते.
राज्यातील पोलिसांमध्ये दहशत : यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, "आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेरे आणि दरोडेखोर आहे. जनतेचे पैसे लुटणे, खोट्या जाहिराती करुन लोकांना फसवणं त्या आधारावर सत्तेची गर्मी अनेकदा दिसून आलीय. सदा सरवणकर गोळ्या झाडतो हे देखील बघायलं मिळालं. यापूर्वी असं या महाराष्ट्रात कधीही घडलं नाही. राज्यातील पोलिसांमध्ये दहशत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत." अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केलीय. काहीही कारण नसताना मीरा-भाईंदरमध्ये मुस्लिमांची घर पाडण्यात आली. कुठलंही कारण नसताना मुस्लिमांना त्रास दिला जातोय. महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीला भाजपाप्रणीत सरकार संपवत आहे, अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केलीय.