मुंबई Tensions in MVA Over MLC polls :महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या चार जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपावर महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला. तशाच प्रकारचा तिढा महाविकास आघाडीत पुन्हा विदान परिषद निवडणूक 2024 मध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना विचारात न घेता उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केली. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते. याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विधान परिषद निवडणूक 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
बसून चर्चा केल्यानंतर तोडगा निघेल :या संदर्भात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई, नाशिक शिक्षक मतदार संघासाठी निवडणुका होत आहेत. त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो, की महाविकास आघाडीतील आम्ही सर्व एकत्र बसून सदर मतदार संघातील उमेदवार जाहीर करावे. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या दोन जागा जाहीर केल्या. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते परदेशात होते. त्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं की कोकण आणि नाशिकमध्ये आमचे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांची नावं देखील त्यांना सांगितलं. रमेश किर आणि गुळवेची नावं त्यांना सांगितली. मात्र त्यांनी गुळवे यांना बोलून त्यांचं 'कंगन' बांधून त्यांना पक्षाचं तिकीट जाहीर केलं. खरंतर यामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की, याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला असता, तर विधान परिषदेत चारही जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतील. अजून देखील काही वेळ गेलेल्या नाही, आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. मुंबईमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाकडून कोणताही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. काही लोकांनी अपक्ष भरलेला आहे, मात्र आम्ही पक्षाकडून त्याला अधिकृत तिकीट दिलेलं नाही. वेळ आली तर ते आपला अर्ज माघारी घेऊ शकतात. निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जावं, त्याबाबत बसून निर्णय घ्यावा. मला विश्वास आहे की जागा वाटपासंदर्भात जो वाद निर्माण झाला आहे, तो बसल्यानंतर त्यावर तोडगा निघेल," असा विश्वास असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीवर फोन करुनही उद्धव ठाकरेंशी झाला नाही संपर्क :विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उबाठा गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. नाना पटोले यांनी सांगितल्यानुसार नाशिक आणि कोकण मतदारसंघातील उमेदवारी मागं घेण्याच्या भूमिकेत उद्धव ठाकरे नसल्याचं दिसत आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, "बघू आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे, आज दुपारपर्यंत वेळ आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही," असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. "सकाळी मातोश्रीवर फोन लावला, मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही," असंही त्यांनी सांगितलं.