पुणे Namo Rojgar Melava : बारामती इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’चं आयोजन करण्यात आलंय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसंच इतर सेवा क्षेत्रातील 300 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी यात सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या 40 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मात्र यावर आम आदमी पक्षानं आक्षेप घेत 'नमो महारोजगार मेळाव्यात' रोजगार नव्हे तर ट्रेनी पदं देण्यात येणार असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी केलाय.
सरकार तरुणांच्या भावनांशी खेळतंय : 'आप'चे प्रदेश संघटक विजय कुंभार म्हणाले की, "राज्य सरकारनं बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलंय. यात अमाप खर्च करण्यात आलाय. पण बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ करण्याचं काम सरकार करत आहे. यात 43 हजार ते 50 हजार नोकऱ्या देण्यात येतील असं भासवलं जात होतं. पण शासनानं पुरवलेल्या तक्त्यात 43 हजार पैकी 30 हजार पदं ही ट्रेनीची आहे. यांना नोकऱ्या देण्यात येणार नाही. हा सगळा तरुणांच्या भावनांशी खेळ आहे."