खुनाच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी नागपूरNagpur Murder Case :शहरातील इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जाटतरोडी परिसरात एका 22 वर्षीय तरुणाची त्याच्या कुटुंबीयांसमोरच निर्घृण हत्या झाली आहे. महेश विठ्ठल बावणे असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याची पत्नी गर्भवती असून काल (21 फेब्रुवारी) तिच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रम होता. पण, त्यावेळी आरोपीनं महेशची हत्या केल्यामुळे बावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
बाल-लेकानं मिळून केली हत्या:मृतक महेश विठ्ठल बावणे यांच्या घरी काल (बुधवारी) पत्नीच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. पाहुण्यांच्या आगमनानं घर भरलं होतं. महेशच्या पत्नीच्या हातावर मेहंदी काढण्याची लगबग सुरू होती. परिसरात राहणाऱ्या एका तरुणीनं मेहंदी काढण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी आरोपी शंकर भोलासिंह राठोड हा तिथे आला. तो तरुणीला जोरदार शिवीगाळ करू लागला. भोलाकडून मेहंदी काढणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी पैसे उधार घेतले होते.
काही महिन्यांपूर्वी लागली होती नोकरी:पैसे मिळत नसल्यानं आरोपी तरुणीला उद्देशून शिवीगाळ करत होता. म्हणून महेशनं आरोपी भोलाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. माझ्या घरी कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवीगाळ करू नका, असं त्याला म्हटल्यानंतर आरोपी भोला आणखीच संतापला. यानंतर त्यानं मुलाला बोलवून घेतलं. अखेर बाप-लेकानं संगनमत करून महेशवर हल्ला केला. महेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत महेशचा जागीच मृत्यू झाला. मृतक महेशच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यानं अनुकंपावर महेशला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली होती. घरात सुख आणि समाधान येत असताना अचानक महेशचा खून करण्यात आला.
कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या:खूनाची दुसरी घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. यात आयटी कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीची त्याच्या दोन सहकाऱ्यांनी हत्या केली. एल. देवनाथन उर्फ एन. आर. लक्ष्मीनरसीम्हन असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. हत्या करणाऱ्या दोघांनी ही घटना हत्या नसून अपघात असल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांसमोर त्यांचा बनाव फार काळ टिकू शकला नाही.
असा रचला अपघाताचा बनाव: 19 फेब्रुवारीला पवन हलवाई यांना ओरडण्याचा आवाज आल्यानं ते एल. देवनाथन यांच्या रूममध्ये गेले. यावेळी त्यांना ते बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या छातीतून रक्त येत असल्याचं दिसलं. तसेच त्यांचे शेजारी गौरव चंदेल हे जोरजोरात ओरडून त्यांना उठवित होते. त्यानंतर दोन्ही मित्रांनी एल. देवनाथन यांच्या छातीला पट्टी बांधून ऑरेंजसिटी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. प्राप्त वैद्यकीय सुचनेवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी नमुद घटनास्थळाची पाहणी करून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्यामार्फत पुरावे गोळा केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून हा अपघात नसून हत्या असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर दोघांनी हत्येची बाब कबूल केली आहे.
बॉसगिरी भोवली, हत्या झाली:एल. देवनाथन मिहान येथे एका कंपनीत नोकरीला होते. ते बेलतरोडी हद्दीत अग्निरथ संकुल येथील फ्लॅटमध्ये गौरव भिमसेन चंदेल आणि पवन अनिल गुप्ता यांच्या सोबत एकत्र किरायानं राहत होते. तिघेही एका कंपनीत कामाला होते. मात्र, एल. देवनाथन हे आरोपींचे बॉस असल्यानं कामात चूक झाल्यानं ते त्यांच्यावर ओरडायचे. हीच गोष्ट आरोपींना सहन होतं नव्हती. घटनेच्या दिवशी तिघेही एकत्र बसले होते. त्यावेळी बॉसगिरीवरून आरोपींनी संगनमत करून एल. देवनाथन यांचा खून केला. पोलिसांनी आरोपी गौरव भिमसेन चंदेल आणि पवन अनिल गुप्ता यांना अटक केली.
22 दिवसात 12 हत्या :गेल्या 22 दिवसांच्या कालावधीत नागपूरमध्ये 12 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात दोन दुहेरी हत्याकांडाचादेखील समावेश आहे. शहरात 22 दिवसांमध्ये नागपुरात 12 खुनाच्या घटना घडल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे अद्याप आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत. नागपूरच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
हेही वाचा:
- मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून महिलेची हत्या, विधीसंघर्षग्रस्त बालकाला घेतलं ताब्यात
- शिवजयंतीचे पोस्टर लावण्याचा वादातून धावत्या दुचाकीवरच मित्रावर सपासप वार, नाशकात खुनाचा थरार
- अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात