नागपूरVinay Punekar Murder Case : दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी) नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजनगर येथे राहणारे फ्रीलान्सर प्रेस फोटोग्राफर विनय उर्फ बबलू पुणेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्या प्रकरणी सदर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तर ज्यानं गोळ्या झाडून विनय पुणेकर यांची हत्या केली तो आरोपी अद्यापही फरार आहे. या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या हत्या प्रकरणामागे 'लव्ह ट्रँगल'चा अँगल दिसून येत असल्याची माहिती पोलीस सूत्रानं दिली आहे.
पोलिसी खाक्या दाखवताच हत्येचा उलगडा:शनिवारी दुपारी विनय पुणेकर हे त्यांच्या घरी एकटेचं असताना एक आरोपी त्यांच्या घरात शिरला. त्या आरोपीनं विनय यांच्या गळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे विनय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. विनय पुणेकर यांची हत्या कुणी आणि कशासाठी केली याबाबत तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी विनय यांच्या मोबाईलवर आलेल्या कॉल्सचे डिटेल तपासले. तेव्हा एका महिलेशी वारंवार संभाषण झालं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं देत होती. त्यामुळे पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तिनं विनय पुणेकर हत्या प्रकरणाची स्क्रिप्ट वाचली.
हत्येमागे लव्ह ट्रँगलचा अँगल?: गेल्या काही वर्षांपासून विनय आणि साक्षी यांच्यात मैत्री होती. ते एकमेकांच्या प्रेमातही होते. साक्षीच्या जीवनात मध्यप्रदेशचा रहिवासी हेमंत शुक्ला नामक व्यक्ती आला. हेमंतला साक्षी आणि विनयची मैत्री अजिबात आवडत नव्हती. साक्षी आणि विनय यांच्यातील प्रेमसंबंधाच्या संशयावरून हेमंत हा साक्षीचा मोबाईलदेखील तपासत होता. हेमंतनं साक्षीला विनय सोबत भेट घडवून देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तो विनयच्या घरी दाखल झाला. त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं? याचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. त्याचवेळी हेमंतनं सोबत आणलेल्या बंदुकीतून विनयवर गोळी झाडली. बंदुकीतून सुटलेली गोळी विनयच्या गळ्यात लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात उघड झाली आहे.
महिलेला अटक मात्र, गोळी झाडणारा आरोपी फरार: विनय पुणेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी साक्षी नामक महिलेला अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी हेमंत शुक्ला हा पळून गेला असल्यानं पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या वैमनस्यातून हत्या झाली असावी, असा कयास लावला जात आहे. विनय पुणेकर कधीकाळी प्रेस फोटोग्राफर होते, अशीदेखील माहिती पुढे येत आहे.
हेही वाचा:
- हरियाणा INLD चे अध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या
- छायाचित्रकाराची घरात घुसत गोळ्या झाडून हत्या, २४ दिवसात नागपुरात १३ खून
- खुनांच्या दोन घटनांनी हादरली उपराजधानी, तरुणाची कुटुंबियांसमोरच निर्घृण हत्या