मुंबई Mumbai Urja Marg Project :मुंबईकरांचा विजेचा प्रश्न यंदा सुटणार आहे. पडघा-खारघर वीज वाहिनीमुळे मुंबईकरांना यावर्षी अतिरिक्त 2,000 मेगा वॅट वीज मिळणार आहे. या वीज लाईनची एकूण लांबी 90 किमी आहे, परंतु यातील 30 किमी जंगलाच्या जमिनीतून आणि 20 किमी डोंगराळ प्रदेशातून जातो. या नवीन वीज लाइनमुळे मुंबईला अतिरिक्त 2,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना 400 कोटीची नुकसान भरपाई :या वीजवाहिनीसाठी पनवेल, नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी यासह अन्य भागांत ट्रान्समिशन लाइनच्या मार्गातील सुमारे 20 हजार झाडं तोडण्यात आली. टॉवर आणि उर्जा लाईनसाठी जमिनी देणाऱ्या 10,728 शेतकऱ्यांना 400 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आली. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. जानेवारी 2023 मध्येच कामाला सुरुवात झाली आणि 16 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पाची सुरुवातीची किंमत 900 कोटी रुपये होती, जी नंतर वाढून 1,140 कोटी रुपये झाली.
उन्हाळ्यात वाढते विजेची मागणी : "उन्हाळ्यात एमएमआरमध्ये सर्वाधिक विजेची मागणी 4,500 मेगावॅट होती. राज्य सरकारने 323 चौरस किलोमीटरच्या नवीन शहर विकास प्राधिकरणाला यापूर्वीच मान्यता दिली असल्यानं या विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पनवेल तालुक्यातील 16 गावांमधून मुंबई आणि उपनगरांना वीजपुरवठा करणाऱ्या मुंबई पॉवर प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या बहुचर्चित प्रकल्पातून लवकरच विजेचे वहन सुरू होणार आहे. यामुळे मुंबईला 2,000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार," असं प्रकल्प प्रमुख निनाद पितळे यांनी सांगितलं.