नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर मंगळवारी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याबाबत अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहायक उज्वल भोयर यांनी काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यात ते म्हणता की चार जणांनी अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक केली. भाजपा जिंदाबाद, अनिल देशमुख मुर्दाबादचे नारे लावत निघून गेले, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
असा घडला दगडफेकीचा घटनाक्रम : "विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सलील अनिल देशमुख यांच्या प्रचाराची सभा नरखेड येथे होती. ती सभा सायंकाळी 05 वाजताच्या सुमारास संपली, अनिल देशमुख, ड्रायव्हर धिरज चंडालीया आणि डॉ गौरव चतुर्वेदी आणि मी आम्ही सर्वांनी नरखेडमध्ये नागरिकांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर आम्ही नरखेडवरून तिनखेडा भिष्णुर मार्गे काटोलला येण्यास निघालो. त्यावेळी आमची गाडी समोर होती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या 2 गाडया मागे होत्या. अंदाजे रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान बेल फाटा येथे आलो असता, त्याठिकाणी रस्त्याला वळण असल्यानं गाडीची गती कमी झाली. तेव्हा अचानक 4 अज्ञात तरुण गाडीसमोर आले. त्यापैकी एका व्यक्तीनं मोठा दगड अनिल देशमुख बसलेल्या समोरील काचावर मारला. त्यामुळे काचेला तडा गेला. अनिल देशमुख बसलेल्या बाजूनं एक दगड आला. मागच्या बाजुनं एक दगड आला आणि ते 'भाजपा जिंदाबाद अनिल देशमुख मुर्दाबाद' असे नारेबाजी करीत चौघंही 2 दुचाकी घेऊन भारसिंगी रोडनं पळून गेले. मी अनिल देशमुख यांच्याकडं पाहिले असता त्यांच्या कपाळावर रक्त निघत होते. आम्ही सर्व घाबरलेलो होतो. आम्ही अनिल देशमुख यांना त्या गाडीतून उतरवून आमच्या मागच्या गाडीत बसवून काटोल दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर इथं रेफर केलं आहे," असं तक्रारदारानं नमूद केलं आहे.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार काटोलमध्ये तळ ठोकून : अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या दगडफेकीनंतर काटोल शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे स्वतः काटोलमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर हे देखील रात्री काटोलला दाखल झाले. "परिस्थिती नियंत्रणात असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आलाय. काटोल पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला," अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन : "अवघ्या काही तासात मतदानाला सुरुवात होणार आहे. शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका. घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचा संपूर्ण तपास योग्य पद्धतीनं होईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल," असं पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :