मुंबई-मुंबईतील तापमानाचा पारा खाली घसरल्यानं सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. मंगळवारी गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद सांताक्रुज येथे नोंदवण्यात आली. सांताक्रुज येथे 16.8 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. देशातील मान्सून परतल्यानंतर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याचं प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरत चालला आहे.
मुंबईतील तापमानाचा पारा 2016 च्या नोव्हेंबरनंतर मंगळवारी 16.8 डिग्री सेल्सिअस इतक्या खाली पहिल्यांदाच गेला आहे. मुंबईतील हवामानात पुढील तीन ते चार दिवस गारवा राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस पारा 17 अंशांवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 हा गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक थंड महिना असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 11 नोव्हेंबर 2016 रोजी सांताक्रुज येथे 16.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं.
मुंबईत सर्वात कमी तापमान केव्हा होते? सांताक्रुज येथे नोंदवण्यात आलेले 16.8 डिग्री सेल्सिअस तापमीन मुंबईतील सरासरी तापमानाच्या 3.8 डिग्री सेल्सियसने कमी आहे. तर कुलाबा येथील तापमान 22.5 डिग्री सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील तापमानात घट झाल्यानं तापमान 18.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. 2022 च्या नोव्हेंबरनंतर इतके खाली तापमान पहिल्यांदाच उतरले होते. मुंबईत 1950 मध्ये सांताक्रुज येथे 13.3 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आलं होते. हे तापमान मुंबईतील आजपर्यंतचे सर्वात कमी तापमान समजले जाते.