मुंबई Heavy Rain In Mumbai :मुंबई शहरासह उपनगरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनसामान्यांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तसंच या पावसाचा मोठा फटका रस्ता आणि रेल्वे वाहतुकीला बसलाय. मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण झालीय. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या रुळावर पाणी आल्यामुळं मुंबईकडं येणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यात. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं त्याचा फटका सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला देखील बसलाय.
मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास (ETV Bharat Reporter) मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे एक्स्प्रेस दादर ते कुर्ला दरम्यान थांबवण्यात आल्यामुळं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास करावा लागला. त्यांच्यासह अजून नऊ ते दहा आमदार एक्स्प्रेसमध्ये अडकल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली.
काय म्हणाले अमोल मिटकरी : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अमोल मिटकरी म्हणाले की, कुर्ला आणि दादर स्थानकाच्या दरम्यान आज आम्ही पायी चाललो आहोत. पावसामुळं आमच्यासोबत अजून आठ ते दहा आमदार एक्स्प्रेसमध्ये अडकून आहेत. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालय. हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा असल्यामुळं वेळेवर पोहोचण्यासाठी हाल होत असल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. तसंच मुंबईतील सर्व वाहतूक सेवा लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षाही मिटकरींनी यावेळी व्यक्त केली.
अनिल पाटील यांची प्रतिक्रिया :यावेळी बोलतानाराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, "मी आता महानगरपालिकेच्या कंट्रोल रूमला भेट देणार असून तेथील आढावा घेणार आहे. त्यानंतर मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूमला जाऊन राज्यातील विविध भागातील परिस्थितीचा आढावा घेईन." तसंच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दक्षता आणि तत्काळ मदतीविषयी सूचना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका - Maharashtra Rain Updates
- मुंबईत सहा तासात 300 मिलिमीटर पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Mumbai Rain