मुंबई Mumbai Rain Update : रविवारी सकाळपासूनच मुंबई तसंच मध्य आणि पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील दादर, प्रभादेवी, हिंदमाता, सांताक्रुज, अंधेरी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं आहे. तर पाणी साचल्यामुळं पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून, साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना वाट काढणं अवघड होत आहे.
मुंबई उपनगरात ऑरेंज अलर्ट : दरम्यान, मुंबईत मागील दोन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतूक तसंच रेल्वे वाहतुकीवर होत आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरा सुरु आहे. आज रविवारची चाकरमान्यांना जरी सुट्टी असली तरी फिरण्यासाठी आणि कामासाठी अनेक मुंबईकर रविवारी सकाळी बाहेर पडत असतात. परंतु बाहेर गेल्यानंतर वाहतूक कोंडींचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. तर सातारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय. तसंच यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, नांदेड आणि पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.