मुंबई :Deep Clean Drive Campaign : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि शहरातील रोगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 'डीप क्लीन ड्राईव्ह अभियान' सुरू केलं आहे. सलग 13 आठवड्यांपासून लोकसहभागातून राबवलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचे आता सकारात्मक परिणाम जाणवू आहेत असा दावा स्वत: पालिका आयुक्तांनी केला आहे. 'खालावलेला हवेचा दर्जा हळूहळू उंचावत असून, हवा प्रदूषण झपाट्याने कमी झालं आहे. हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण देशासाठी आदर्शव्रत ठरत आहे. यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल. डेंगी, मलेरिया, लेप्टो यांसारख्या पावसाळी आजारांमध्येदेखील घट होवून रोगराई प्रसारास प्रतिबंध होईल.' असंही पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले आहेत.
लोकचळवळ बळकट करावी : आयुक्त चहल सध्या विविध वॉर्ड ऑफिसला भेट देत आहेत. सोबतच डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेचा आढावा देखील या दौऱ्यातून ते घेत आहेत. आज काही धारावी कुंभारवाडा परिसराला भेट दिली. यावेळी बोलताना आयुक्त चहल म्हणाले की, मुंबई महानगरात सलग 13 आठवड्यांपासून विविध ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह अविरतपणे सुरु आहे. या मोहिमेत विशेषत: झोपडपट्टी आणि तत्सम परिसरातील रस्ते, गल्लीबोळ, पायवाटा स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेची व्याप्ती हळुहळू वाढत आहोत. जोपर्यंत नागरिकांचा अपेक्षेइतका सहभाग वाढत नाही तोपर्यंत स्वच्छता मोहीम यशस्वी होणार नाही. सर्व मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून स्वच्छतेची ही लोकचळवळ बळकट करावी, असं आवाहनही चहल यांनी केलं आहे.
कचऱ्याचं संकलन करण्यात येत : डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. पुढील 9 ते 10 आठवड्यांमध्ये प्रशासकीय वॉर्ड स्वच्छतेकामी पिंजून काढण्याचं लक्ष्य आहे. सध्या झोपडपट्टी आणि तत्सम परिसरातील छोटे मोठे रस्ते, पदपथ कचरामुक्त, धूळमुक्त करून ब्रशिंग केले जात आहेत. त्यानंतर पाण्याने धुवून काढण्यात येत आहेत. मागच्या आठवड्यात झोपडपट्टी भागातून अडीच हजार मेट्रीक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आल्याचंही चहल यांनी सांगितलं.
हवा प्रदूषण नियंत्रण : ओला सुका कचरा वर्गीकरण, सार्वजनिक प्रसाधनगृहं स्वच्छता, रस्ते पदपथ, नालेसफाई यामुळं मुंबईकरांना सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे वाढलेले हवा प्रदूषण आता नियंत्रणात आलं आहे. हा एक राष्ट्रीय विक्रम असून त्यात सखोल स्वच्छता मोहिमेचा सिंहाचा वाटा आहे. हवा प्रदूषण नियंत्रणाबरोबरच डेंगी, मलेरिया, लेप्टो यांसारख्या पावसाळी आजारांमध्येदेखील घट होणार आहे. रोगराईच्या प्रसारासही आळा बसणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.