मुंबई Central Railway Mega Block Update : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील 36 तासांचा ब्लॉक आणि ठाणे स्थानकातील 63 तासांचा ब्लॉक आजपासून सुरू झालाय. या मेगाब्लॉकचा फटका तब्बल 33 लाख प्रवाशांना बसणार आहे. यामुळं नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत असून तीन दिवसांत तब्बल 930 लोकल रद्द करण्यात आल्यानं नागरिकांचा अर्धा तासांचा प्रवास एक तासावर गेलाय. त्यामुळं ठाणे, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली असून प्रवाशांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय.
गरज असेल तरच घराबाहेर पडा : गुरुवारी रात्रीपासून ते रविवारपर्यंत दोन ठिकाणी मेगाब्लॉक घेण्यात आलेत. या मेगा ब्लॉकमध्ये आज (31 मे) 161 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आज अप आणि डाऊन मार्गावर पाच ते दहा मिनिटं गाड्या उशिरानं धावताय. मात्र, उद्यापासून म्हणजे शनिवारपासून मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा या स्टेशनच्या दरम्यान कोणत्याही गाड्या चालवण्यात येणार नाहीत. त्यामुळं जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी केलंय.