मुंबई Maharashtra Human Trafficking :मानवी तस्करी प्रकरणी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागरला (वय 28) गुन्हे विभागाच्या दक्षता पथकानं शुक्रवारी अटक केली. त्यानंतर ब्रह्मज्योतीची मैत्रीण सिमरन तेजी आणि सब लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा यांना पुण्याहून अटक करण्यात आली आहे. या दोघांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. या दोघांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : विपिन कुमार डागर हा वेस्टर्न नेवल कमांडमध्ये इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होता. चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून बोगस कागदपत्रांचा वापर करून तरुणांना दक्षिण कोरियात पाठवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळं मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. जम्मू काश्मीरमधील सुचेतगड येथूनदेखील दीपक डोगरा आणि रवी कुमार या दोन आरोपींना अटक करण्यात आले. त्यांना 1 जुलैला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
पैसे घेण्यासाठी बनावट खाती-सिमरन या महिला आरोपीनं पैसे घेण्यासाठी बँक खाती उघडली होती. तिचे तीन ते चार बँक खाती आहेत. सिमरननं तिची आई आणि आजीच्या नावे देखील बँक खाती उघडली आहेत. त्या बँक खात्यातदेखील दक्षिण कोरियाला जाणाऱ्या आणि पाठवलेल्या तरुणांकडून मिळणारी रक्कम जमा केली होती, असं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. त्याचप्रमाणे आरोपी दीपक डोगरा हा जम्मू काश्मीरमधील तरुणांना हेरून त्यांना दक्षिण कोरियात पाठवण्यासाठी मदत करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तर आरोपी रवी कुमार (वय 35) हा दक्षिण कोरियाला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडील ना हरकत प्रमाणपत्रासह काही कागदपत्रं बोगस आढळून आली.
पाच आरोपींना अटक : 26 जून रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420, 465, 467, 468, 471, 120 ब सह पासपोर्ट कायद्याच्या कलम 12(1)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरियन दूतावासाला भेट देणारा तसेच बनावट कागदपत्रे तयार करून दूतावासात पाठवणारा लेफ्टनंट कमांडर विपिन डागर याला अटक करण्यात आली आहे. तसेच सब-लेफ्टनंट ब्रह्मज्योती शर्मा हा सूत्रधार असून त्याच्या सूचनेवर विपीन डागर काम करत होता. शर्मा हा लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे काम करत होता. ब्रह्मज्योती या आरोपीची जवळची मैत्रीण असलेल्या सिमरन तेजीने तिच्या विविध बँक खात्यांद्वारे गुन्ह्यातील रक्कम स्वीकारली आहे. तिने ब्रह्मज्योती या आरोपीशी संबंधित खोटे मोबाइल तपशील देऊन नवीन बँक खाती उघडली असल्याचेदेखील तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा
- साताऱ्यातील केळवली धबधब्यात पोहताना कराडचा तरूण बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू - Karad youth drowned
- NEET पेपर लिक प्रकरण: महाराष्ट्रात कमी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परराज्यात जास्त मार्क; लातूरच्या 'नीट' तज्ज्ञांचा 'हा' मोठा दावा - NEET Exam Scam
- वसतिगृह बांधण्याच्या नावाखाली उकळले 9 कोटी; 'तिकडी'विरोधात गुन्हा दाखल - Mumbai Fraud News