मुंबईMoney Embezzlement : भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्यासहित संस्थेशी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांविरोधात वडुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य तक्रारदार यांचा पुन्हा जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा, अशी अपेक्षा खंडपीठानं व्यक्त केली आहे. याप्रकरणी याचिकादार दीपक देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. सतीश मानेशिंदे, अॅड. वैभव गायकवाड यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारतर्फे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप :तपास अहवाल सातारा पोलीस अधीक्षकांनादेखील दाखवण्यात यावा, असं सांगण्यात आलं. तीन आठवड्यात हा अहवाल सादर करावा. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. कोविड काळात मायणी खटाव वैद्यकीय महाविद्यालयात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी करत गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याचं आणि सखोल तपास करण्याचे निर्देश सातारा पोलिसांना दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर वडुज पोलिसांनी याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासहित इतर पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याचिकादार दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्यानं त्यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.